महायोद्धा संताजी : दोडेरीचा संग्राम
- आदित्य गोखले
- Dec 15, 2022
- 5 min read
संताजी घोरपडे म्हणजे एक वादळ, संताजी घोरपडे म्हणजे एक विजेचा लोळ, संताजी घोरपडे म्हणजे पराक्रमाचा महामेरू. सरनोबत संताजींची दहशत औरंगजेब पासून साधारण मोगली शिपाया पर्यंत सगळ्यांनाच होती. ते व्यक्तिमत्व तसंच होतं - निडर आणि अतिशय पराक्रमी. मोगल इतिहासकार खफी खान म्हणतो की संताजींशी युद्ध म्हणजे तीनच परिणाम - मरण पत्करणे, खंडणी देऊन वाट मागणे किंवा युद्धकैदी होणे. संभाजी महाराजांच्या मृत्यू नंतर सरनोबत झालेल्या संताजींनी अनेक लढाया गाजवल्या. महाराष्ट्र पासून कर्नाटक ते जिंजी ह्या सगळ्या पट्ट्यात मोगल सैन्याला त्यांनी सळो की पळो करून सोडलं होतं. अशा अनेक लढायांपैकी एक संस्मरणीय लढाई म्हणजे दोडेरीची लढाई. ह्या लढाईची जास्त माहिती मराठी ऐतिहासिक दस्तैवजांपेक्षा मोगल इतिहासकारांच्या नोंदीत आढळते. साकी मुस्तैद खान आणि खफी खान दोघंही ह्या लढाईचे वर्णन करतात.मोगल इतिहासकारांच्या लिखाणात तुम्हाला मोगलांचा पराभव झालेल्या युद्धांची वर्णने जास्त कधीच सापडणार नाहीत - पण संताजींनी त्यांना अशी काही भुरळ घातली होती की संताजींच्या पराक्रमाची आणि त्यांनी केलेल्या लढायांची सविस्तर वर्णने आपल्याला मोगली साधनात सापडतात.
संतांजींचे डावपेच - मोगल सैन्याची दाणादाण
संताजी कर्नाटक प्रांतात धुमाकूळ घालत असल्यामुळे त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने 2 वेगळ्या फौजा पाठवल्या.
सिराचा मोगली फौजदार कासिम खान याला औरंगजेबाने फौजेसह जाऊन संताजींचा समाचार घेण्याचा हुकूम फर्मावला. त्याच वेळी त्याच्या मदतीला दुसरी एक शाही फौज निघाली होती जिथे नेतृत्व मातब्बर सरदार खानाजद खान आणि त्याच्या बरोबर सफशिकान खान, सय्यद असालत खान आणि मुहम्मद मुराद खान असे सरदारांकडे होते या दोन फौजा १९ जानेवारी १६९५ च्या आसपास संताजींच्या फौजेपासून सहा कोस दूर असताना एकमेकांना भेटल्या.
खानाजद खानाच्या पाहुणचारासाठी कासीम खानाने स्वतःच्या अख्त्यारीतले महागडे नवे कोरे कर्नाटकी तंबू, सोने, चांदी, धातू आणि चिनी मातीची भांडी काढली आणि स्वतःच्या तंबू आणि सामग्री बरोबर तीन कोस आघाडीला पाठवली. ३ कोस पुढे प्रशस्त जागी छावणी उभारून तळ ठोकण्याचा मनसुबा खानाने केला होता. ह्या सगळ्या ताम-झामा ची बातमी संताजींना समजताच त्यांनी एक अतिशय चलाख योजना आखली. नेहमीप्रमाणे गनिमाच्या ध्यानीमनी ही नसताना विजेच्या वेगानी हल्ला करून शत्रूला जबर तडाखा द्यायचे असे संताजींनी ठरवले. स्वतःच्या सैन्याचे त्यांनी ३ तुकड्यांमध्ये विभाजन केले. पहाट उजाडत असतानाच पहिल्या तुकडीने हल्ला चढवला आणि वर सांगितलेलं सर्व किमती सामान लुटून नेले. कासीम खानला ही बातमी कळताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. खानाजद खानला झोपेतून न उठवता तो स्वतः गनिमाचा समाचार घेण्यास निघाला. संताजींची दुसरी तुकडी तिथे त्याची वाटच बघत होती - कासीम खानाच्या सैन्याची जबरदस्त कत्तल झाली. थोड्या वेळात खानाजद खान मुक्कामी तळ सोडून कासीम खानाच्या मदतीला आला. सगळे मातब्बर मोगल सरदार आणि बरेच सैन्य लढाईमध्ये गुंतले होते तेव्हा अचानक संताजींच्या तिसऱ्या तुकडीने त्यांच्या मुक्कामी तळावर हल्ला चढवून उरले सुरले सगळे सामान पण लुटून नेले !!!!! ह्यातून आपल्याला झलक मिळते ती संताजींच्या डावपेच आखण्याच्या कौशल्याची !!
जोरदार लढाई चालू असताना मुक्कामी तळावर झालेला हल्ला आणि लुटालूटीची बातमी जेव्हा दोन्ही खानांना समजली तेव्हा त्यांना जबरदस्त हदरा बसला. संताजींच्या वेगवेगळ्या तुकड्या वेगवेगळ्या ठिकाणी हल्ला करत असल्यामुळे मोगलांना नक्की किती शत्रू आहे आणि तो कुठल्या बाजूने हल्ला चढवतोय ह्याचा अंदाज आला नसावा. दोघांनी निर्णय घेतला की जवळच्या दोडेरी किल्ल्यात आश्रय घ्यावा - हा किल्ला तेव्हा मोगलांच्याच ताब्यात होता. किल्ल्यासमोर एक पाण्याचे तळेही होते. मोगली फौज लढत लढत संध्याकाळ पर्यंत किल्ल्याजवळ पोचली. संताजींची फौज त्याच्या मागोमाग त्यांचा पाठलाग करत होती - पण आता त्यांनी पाठलाग थांबवून किल्ल्याहुन थोडा लांब स्वतःचा तळ ठोकला. आधीच संकटात सापडलेल्या कासीम खानाच्या फौजेला किल्ल्यातल्या मोगली फौजेनी आत घेण्यास साफ नकार दिला !!! ह्याचं कारण होतं की किल्ल्यात अतिशय मर्यादित धान्यसाठा होता. तीन दिवस संताजींच्या फौजेने हल्ला न करता केवळ आपले मोर्चे उभे केले होते. संताजींना हे पक्के माहिती होतं की गनिमाची रसद आज ना उद्या संपणार आहे आणि त्यांना निसटून जायचा कुठलाही पर्याय नव्हता. चितळदुर्गचा जमीनदार आणि कासिम खान यांच्यात जुना वाद होता - चौथ्या दिवशी हा जमीनदार आपली फौज घेऊन संताजींना मिळाला. दोघांनी मिळून आता कासिम खानाच्या फौजेवर हल्ले चालू केले. त्यामुळे चौथ्या दिवशी खानाच्या फौजेला गढीत प्रवेश करण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. साकी मुस्तैद खानच्या म्हणण्यानुसार तर परिस्थिती इतकी निर्वाणीची झाली की कासिम खान, खानाजद खान, सफशिकान खान आणि इतर मोठ्या मोगली सरदारांनी स्वतःच्याच फौजेला अंधारात ठेवून रात्रीत गढी मध्ये छुप्या रीतीने प्रवेश केला. संताजींनी किल्ल्याला वेढा घातला आणि तलावाचा ताबा घेतल्याने किल्ल्यातल्या शिबंदीचे पाणी मारले गेले.
मोगली सैन्य नामोहरम
संताजींनी गढी वर हल्ला चढवला - हा हल्ला परतवण्यात किल्ल्यातील दारुगोळा रिकामा झाला. दुसरीकडे किल्ल्यातले अन्नधान्य आणि चारा पण खूप लोकात आणि जनावरात वाटला गेल्याने संपुष्टात यायला लागले. मोगल फौजेची अवस्था वाईट होती. मराठा शिबिरात बरंच अन्नधान्य व सामग्री होती. काही लोकांनी हे सामान विकत घेऊन किल्ल्याच्या आतल्या मोगलांना आस्मानी भावाने विकायला सुरवात केली. तरीही एवढ्या फौजेला रसद पुरवठ्याला येणं शक्यच नव्हतं. बरेच सैनिक भुकेनी मरायला लागले, घोडे एकमेकांच्या शेपट्या चारा समजून चावायला लागले. ह्यातच वेढ्याच्या तिसऱ्या दिवशी कासिमखान मरण पावला. त्याच्या मरणाबद्दल साकी मुस्तैदखान म्हणतो की अफूचे व्यसन असलेला कासीमखान अफू न मिळाल्याने मरण पावला. ह्या उलट खफी खान म्हणतो कि एक तर कासीम खान पराभवाच्या नैराश्यातून विष खाऊन गेला किंवा मग अफू न मिळाल्याने मरण पावला. कारण काही असो - संताजींच्या कुशल आणि अचूक युद्धनीतीने मोगलांच्या एका बलाढ्य सरदाराचा साफ फडशा पाडला हे मात्र नक्की.
भुकेने बेजार झालेल्या आतल्या सैन्यापैकी बऱ्याच सैनिकांनी किल्ल्याच्या तटावरून उड्या टाकल्या. काही शत्रूशी सामना करायच्या गोष्टी करू लागले तर कोणी शरण जायच्या. संताजींनी वेढा चालूच ठेऊन किल्ल्यातल्या शिबंदीची चोहो बाजूनी नाकाबंदी केली. संताजींची फौज गढीच्या चोहोबाजूनी जोरदार हल्ला चढवत होते - बंदुकीच्या गोळ्यांनी किल्ल्याच्या तटबंदीवरच्या अनेक गनिमांना टिपत होते. आता फार वेळ अशा स्थितीत गडात राहणे शक्य नाही हे खानाजद खानला कळून चुकले. इथे राहिलो तर संताजींची फौज आपल्या पूर्णच फौजेचा फडशा पाडेल अशी भीती त्याला वाटू लागली. लढाईच्या जागी असलेल्या साक्षीदारांचा हवाला मस्सीर मध्ये दिला आहे - त्यांच्या मते एक तृतीयांश मोगली फौज पहिल्यांदी पेशखाने मारले त्या लढाईत आणि किल्ल्याबाहेरच्या तलावा जवळच्या लढाईत मारली गेली होती. त्यातच संताजींच्या फौजेनी गढीचा एक बुरुज उडवून दिला. आता खानाजद खानाने हार मानली आणि संताजींशी तहाची बोलणी चालू केली. तहाच्या अटीनुसार संताजींनी कासिमखानाचे पैसे, सर्व चीजवस्तू, भांडी-कुंडी, हिरे-पाचू, दाग-दागिने आणि त्याच बरोबर घोडे आणि हत्ती सर्व जप्त केले. या सर्व किंमती सामानाशिवाय साधारण वीस लाख रुपये खंडणी संताजींनी वसूल केली असं साकी मुस्तैदखान म्हणतो. तिकडे खफी खानच्या म्हणण्यानुसार तहात संताजींच्या हाती लागलेल्या मोगली संपत्तीचे मूल्य ६० ते ७० लाख रुपयांच्या घरात असावे. अशी जबर खंडणी मोगलांकडून वसूल करून मावळ्यांनी गनिमाला ३ दिवसानंतर वाट दिली - प्रत्येक मोगल सैनिकाला त्याचा घोडा व स्वतःचे कपडे घेऊन जायला परवानगी देण्यात आली, बाकी सगळं खंडणी म्हणून वसूल करण्यात आलं. शरण आलेल्या मोगली फौजेला मराठ्यांनी खाणं आणि पाणी याचे व्यवस्था करून दिली. हे सगळे दोन दिवस चालू होतं, तिसऱ्या दिवशी खानाजद खान आणि राहिलेल्या सरदारांनी अखेर गढी सोडली.
संताजींच्या अतुलनीय युद्धनीती आणि डावपेचंपुढे मोगल फौज आणि त्याचे मोठे मोठे सरदार पूर्ण नामोहरम झाले होते. एका अर्थाने शत्रू आपल्यावर चालून यायच्या आधीच संताजींनी शत्रूलाच गाठून पूर्ण नेस्तनाबूत केले - गनीम एका हल्ल्यातून सावरतोय तोच दुसरा हल्ला, त्यातून सावरायचा आत तिसरा हल्ला. मोगलांची मालमत्ता, खजिना, रसद आणि पाणी तोडून संताजींनी मोठमोठ्या मोगल सरदारांच्या फौजेला गुडघे टेकायला लावले. स्वतःचा जीव वाचवून लाजेने मान खाली घालत खानाजद खान, राहिलेले सरदार आणि फौज दोडेरीहून माघार घेऊन निघून गेली. या सर्व सरदारांना आणि राहिलेल्या मोगली फौजेला मराठ्यांनी बरोबर घेऊन जाऊन अदोनी जवळऔरंगजेबाने पाठवलेल्या हमीदुद्दीन खान आणि रुस्तमदील खान या सरदारांच्या हवाली केले संता.जींच्या नेतृत्वाखाली स्वराज्याच्या फौजेचा निर्विवाद असा विजय झाला. ह्या लढाईच्या थोड्याच दिवसानंतर संताजींनी बसवपट्ट्णम जवळ हिम्मत खान नावाच्या अजून एका बलाढ्य मोगल सरदारला लढाईत गाठून यमसदनी धाडले. थोड्या दिवसांच्या अंतराने महायोद्धा संताजींच्या पराक्रमाला २ मोठे सरदार बळी पडल्याने मोगलांची जबरदस्त पीछेहाट झाली आणि संताजींच्या कारकीर्दीवर अजून एक अति-उच्च असा कळस चढला.
संदर्भ
१. मासिर-ए-अलामगिरी
२. मंतुखाब-उल-लुबाब
३. नुष्का-ए-दिलकुशा
फार सुंदर माहिती व लेखन.